पुणे (प्रतिनिधी) : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही  भागांत आज (सोमवार) उद्या (मंगळवार) अतिवृष्टी  होण्याचा इशारा  हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड,  धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली,  यवतमाळ,  गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी  होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

बंगालच्या उपसागरात वायव्य भागामध्ये  तयार झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ ओडिशाच्या गोपाळपूर, आंध्र प्रदेशच्या किलगामपट्टनम भागात  रविवारी धडकले. या वादळाचा पूर्व किनारपट्टीच्या भागात मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भापासून कोकणपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्य़ात सोमवारी, मंगळवारी काही ठिकाणी अतिवृष्टी,  तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर जळगाव, धुळे, नंदुरबारमध्येही अतिवृष्टी होईल. नाशिक, पुणे, नगर,  सातारा,  कोल्हापूर, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्य़ांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल. तर  विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्य़ात काही ठिकाणी अतिवृष्टी,  तर यवतमाळ, गडचिरोलीसह इतर भागांतही  जोरदार पावसाचा अंदाज आहे.