कुरुंदवाड (प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडकर यांच्या उपस्थितीत तबक मैदानातील जिम्नॅशियम हॉल येथे सोमवारी १३ जूनला सोडत निघणार आहे. ओबीसी आरक्षण वगळून महिला सर्वसाधारण, महिला अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभागांसाठी ही सोडत निघणार असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांनी दिली

कुरुंदवाड पालिकेच्या प्रभाग रचना ६ जून रोजी जाहीर झाल्या आहेत. ३ नगरसेवकांची संख्या वाढणार असल्याने ८ वरून २ प्रभाग वाढून १० प्रभाग झाले आहेत. या १० प्रभागातून १० महिला व १० पुरुष असे २० नगरसेवक निवडून जाणार आहेत. प्रभाग क्रमांक ५ व ९ मध्ये अनुसूचित जातीची मतदार संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या प्रभागातील प्रत्येकी एक-एक जागा आरक्षित मानल्या जात आहेत.

पालिकेत या आरक्षणात अनुसूचित जाती महिला आणि पुरुष दोनच जागांची सोडत काढून सर्वसाधारण महिलांसाठी सोडत काढली जाणार आहे. यानंतर आरक्षणावर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी प्रत्येक प्रभागात यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाचा अद्याप तिढा न सुटल्याने ६ ओबीसी प्रभाग खुले प्रभाग होणार आहेत. शहरात अनुसूचित जातीचे २ प्रभाग वगळता सर्वच प्रभाग जवळपास खुले होणार असल्याने इच्छुकांनी फिल्डींग लावली आहे.