पुणे (प्रतिनिधी) : मागील वर्षीप्रमाणे यंदाही आषाढीवारीवर कोरोना महामारीचे सावट आहे. त्यामुळेही मागील वर्षाप्रमाणे सर्व सोहळे प्रमुखांना पादुका बसमधून नेण्याचा प्रस्ताव शासनाकडून देण्यात आला. मात्र सर्व सोहळेप्रमुखांनी त्याला नकार दिला आणि पायी वारी करण्याची भूमिका घेतली. शासनाने यावर समिती नेमली आणि समितीने आपला अहवाल मंत्रिमंडळाकडे पाठवला. यावर निर्णय येण्यापूर्वीच वारकरी संप्रदायाचे नेते बंडातात्या कराडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून पायीच वारी काढणार असल्याचे स्पष्ट केलंय. त्यामुळे आता शासन आणि वारकरी यांच्यात पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

शासनाने पायी वारी नेण्यासाठी निर्बंध घालून परवानगी द्यावी अन्यथा वारीला येणारा समाज अनियंत्रित असेल. त्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला शासनच जबाबदार राहील असा इशारा कराडकर यांनी दिलाय. कराडकर यांनी मांडलेली ही भूमिका केवळ संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यासाठीची असल्याने इतर सोहळ्यातील पालखी प्रमुख आता कराडकरांच्या मागणीला पाठिंबा देतात की यावरून नवा वाद निर्माण होतो, हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.