कोल्हापूर (प्रतिनिधी) : आपल्या विचारांमधून महात्मा गांधीजींनी स्वच्छतेचे विचार दिले. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना आज (रविवार) महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच आज अँटी-स्पिटिंग मुव्हमेंटच्या वतीने नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य याबाबत जनजागृती व्हावी यासाठी पदयात्रा काढण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना संक्रमण वाढण्याचा धोका आहे, त्याच बरोबर टी.बी.आणि अन्य श्वसनासंदर्भातील गंभीर संसर्गजन्य रोग पसरतात. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल झालेला असल्याने असंख्य नागरिक सार्वजनिक ठिकाणी थुंकून रोगराई पसरवण्याचे काम करताना दिसत आहेत. त्यामुळे थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळ पुढे सरसावली आहे. यावेळी कोल्हापूरातील अनेक दुकानात थुंकीमुक्त कोल्हापूर असे स्टिकर्स लावण्यात आली. येत्या काळात कोल्हापूर स्वच्छ व निरोगी करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे आंदोलनाच्या वतीने पाठपुरावा केला जाईल, असे दिपा शिपुरकर यांनी सांगितले.

ही पदयात्रा केशवराव भोसले नाट्यगृह पासून मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी येथील गांधी पुतळा परिसर येथे विसर्जित झाली. यावेळी जनजागृती करणारे फलक आणि थुंकी विरोधी टोप्या घालून नागरिकांनी उस्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी राहुल राजशेखर, विजय धर्माधिकारी, सारिका बकरे, सागर बकरे, सुनिता मेंगाणे, नीना जोशी, ललित गांधी, गीता हासुरकर, अश्विनी गोपूडगे, मीनाक्षी सुतार, राहुल चौधरी, बंडा पेडणेकर, अभिजित गुरव, जीवन बोडके, विद्याधर सोहनी, कपिल मुळे आदी उपस्थित होते.