वळीवडे सरपंच, ग्रामस्थांकडून तहसीलदार धारेवर

0
235

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आपत्कालीन स्थितीत प्रशासन वळीवडेकडे का दुर्लक्ष करते, असा संतप्त सवाल ग्रामस्थांच्यावतीने लोकनियुक्त सरपंच अनिल पंढरे यांनी करवीरच्या तहसीलदार शितल मुळे-भामरे यांना केला. प्रशासनाच्या नाराजीबद्दल त्यांनी अन्य पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमोर पाढाच वाचला.

पंचगंगा नदीस आलेल्या महापुरामुळे आलेल्या आपत्तीची पाहणी करण्यासाठी शितल मुळे-भामरे व करवीरचे गटविकास अधिकारी जयंत उगले यांच्यासमवेत आल्या होत्या. त्यावेळी सरपंच पंढरे व ग्रामस्थांनी भामरे-मुळे यांना धारेवर धरले. ते म्हणाले की आपत्कालीन स्थितीत नेहमीच प्रशासनाने वळीवडेस दुर्लक्षित केले आहे. वारंवार संपर्क साधूनही आपला संपर्क होत नव्हता. आपणास संदेश पाठवले, मात्र ते अद्यापही पाहिले गेले नाहीत. किमान एका गावच्या प्रथम नागरिकाचा पूरस्थितीमध्ये तरी आपण फोन ऊचलावयास हवा होता. पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यासाठी आम्हाला बोट हवी होती. अखेर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व शेजारी गावांच्या सहकार्याने पूरग्रस्तांची सोय, व्यवस्था आम्ही केली. अशा कठीण अवस्थेत आपण कोठे होता? त्यावर भामरे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. या चर्चेत हस्तक्षेप करताना गटविकास अधिकारी उगले म्हणाले की स्थानिक पातळीवर तलाठी, ग्रामविकास अधिकारी होते ना? त्यावर सरपंच पंढरे व पोलीस पाटील दीपक पासान्ना म्हणाले की ते नेहमी वरिष्ठांकडे बोट दाखवतात. मग गावपातळीवर आम्ही करायचे तरी काय?

यावेळी माजी पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, माजी सरपंच भगवान पळसे, उपसरपंच सुरेखा चव्हाण, माजी उपसरपंच प्रकाश शिंदे, विक्रम मोहिते, संजय चौगुले, शहनाज नदाफ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी चर्चेत सहभाग घेतला. मंडलाधिकारी अर्चना गुळवणी, ग्रामविकास अधिकारी बी डी पाटील, तलाठी प्रवीण शेजवळ यावेळी उपस्थित होते.