‘त्यासाठी’ पंतप्रधानांच्या भेटीची वाट पाहतोय : खा. संभाजीराजे 

0
114

नाशिक (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या ओबीसी समाजात भीती निर्माण झाली आहे हे खरे आहे. मात्र, ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी करून पंतप्रधानांच्या भेटीची मी आज देखील वाट पाहतोय, अजून वेळ मिळाला नाही असे सांगत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी  निराशेचा सूर आळवला. तसेच दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर प्रकाशझोत टाकत शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने मार्गी काढावेत, अशीही मागणी त्यांनी केली. नाशिक येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

मराठा समाजाने पहिल्या दिवसापासूनच सामाजिक मागास सिद्ध केले आहे, असे म्हणत मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती य़ांनी पुन्हा जाहीर भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे (ईडब्लूएस) आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, ईडब्लूएस आरक्षण घेतल्याने समाजाला धोका होणार नाही हे सरकारने सांगावे. ईडब्लूएसमुळे एसईबीसीला धोका निर्माण होईल. किंबहुना ईडल्बूएस आरक्षण सर्व खुल्या वर्गासाठी आहे. ते फक्त मराठा समाजासाठी नाही, असे म्हणत त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला. न्यायालयाकडून चांगला निर्णय अपेक्षित असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.