कळे (प्रतिनिधी) : पणोरे, येथील कलाशिक्षण प्रसारक मंडळ मल्हारपेठ-सावर्डे संचलित लहू बाळा परितकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व मंदार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून भव्य असा वृक्षदिंडी व वृक्षवाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे उदघाटन संस्थापक मारुतीराव परितकर  व पणोरे सरपंच छाया गुरव यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण  गावातील सर्व गल्लींतून टाळ मृदंग, हरिनाम गजर करीत व वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ,वृक्ष लावा दारोदारी समृद्धी येईल घरोघरी, झाडे लावा झाडे जगवा, वृक्षांशी मैत्री पावसाची खात्री, कचरा करू कमी आरोग्याची मिळेल हमी इत्यादी घोषणांसह संपूर्ण गावात पालखीमध्ये वृक्ष ठेऊन त्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नागरिकांना वृक्षांचे महत्त्व सांगत घरोघरी जाऊन वृक्ष वाटप करण्यात आले. शिक्षकांसह विद्यार्थी विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत होते. पणोरे व बळपवाडी या दोन्ही गावातील नागरिकांना एकूण एक हजार वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले. यासाठी वन विभाग साळवण यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमासाठी संस्था कार्याध्यक्ष मंदार परितकर, प्रभारी प्राचार्या भाग्यश्री पाटील मुख्याध्यापक बी.व्ही, भोसले, विलास चौगुले, बळवंत चौगुले , ज्ञानु गुरव, श्रीधर पाटील, दगडू पाटील, शिवाजी बळीप, राजेंद्र पाटील, कृष्णात खुटाळे, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.