कोल्हापूर (प्रतिनिधी) : सहकार क्षेत्रात आशिया खंडातील अग्रगण्य संस्था असलेली कसबा बावड्यातील श्रीराम संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी आज मतदान पार पडले. यावेळी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

पालकमंत्री म्हणाले की, २१ मार्च १९२९ रोजी संस्थापक सिताराम गोपाल मैंदर्गीकर यांनी सहकार्‍यांसोबत संस्थेची स्थापना केली. सात हजारहून अधिक सभासद आणि २३० कोटीहून अधिक उलाढाल असलेली ही आशिया खंडातील नामांकित सेवा संस्था आहे. तसेच प्रशस्त मंगल कार्यालय, भांडी दुकान, उत्कृष्ट धान्य दुकान, ट्रॅक्टर विभाग, खत विक्री, पेट्रोल पंप, दूध डेअरी, अडत दुकान, मुद्रण विभाग, दळप कांडप विभागांमधून सभासदांना सेवा दिली जाते.

तसेच सभासदांच्या घरात कोणतेही कार्य असले की श्रीराम सोसायटीतून आर्थिकसहाय्य उपलब्ध करुन दिली जाते. सभासदांच्या सुखदुःखात ही संस्था गेली जवळपास ९४ वर्षे खंबीरपणे उभी राहिली आहे. संस्थेच्या विविध शाखांमधून हवी ती खरेदी करायची करून याचे बिल सुलभ हप्त्यात उसाच्या बिलातून देण्याची सोय आहे. यामुळे कसबा बावड्यातील प्रत्येक घरात श्रीराम सोसायटी हा जिव्हाळ्याचा विषय असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.