गडहिंग्लज (प्रकाश चोथे) : गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ येथील तानाजीराव मोहिते या ‘गोकुळ’च्या ठरावधारकाचा आज (सोमवार) पहाटे गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालय कोव्हिड सेंटरमध्ये मृत्यू झाला. काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर राहून मृत्यूशी झुंज देत होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली, पण कालच चुरशीने झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत ‘कागदोपत्री’ पीपीई किट घालून त्यांनी ‘मतदान’ केल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे त्यांनी अत्यवस्थ असताना पीपीई किट घालून मतदान केले तरी कसे ? हा चमत्कार झाला तरी कसा, अशी चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.

काल (रविवार) गोकुळच्या निवडणुकीसाठी येथील एम. आर. हायस्कूलच्या सहा केंद्रावर चुरशीने १०० टक्के मतदान झाले. २७३ पैकी एक यापूर्वीच मयत ठरावधारक वगळता उर्वरित सर्व २७२ ठरावधारकांनी मतदान केले. कोरोनाबाधित असणाऱ्या मतदारांना शेवटच्या तासात पीपीई किट घालून मतदान करण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती. अशा पाच मतदारांनी येथे मतदान केले. पण मोहिते हे रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होते आणि आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. अशा परिस्थितीत ते मतदानाला येण्याचा प्रश्नच नव्हता; पण कागदोपत्री त्यांचे मतदान पूर्ण झाले. मग अत्यवस्थ असताना मोहिते यांनी पीपीई किट घालून मतदान केले तरी कसे ? हा चमत्कार झाला तर कसा ? की त्यांच्या नावे कोणी बोगस मतदान केले? या प्रश्नांनी आता जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

जर मोहिते हे मागील काही दिवसांपासून ‘व्हेंटिलेटर’वर होते तसेच काल मतदानादिवशी त्यांची प्रकृती पूर्ण खालावलेली होती, तर त्यांनी मतदान केले तरी कसे ? जर ते मतदानाला आले नाहीत तर मग पीपीई किट घालून मतदानाला कोण हजर राहिले होते ? असे अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहेत. ‘गोकुळ’साठी प्रचंड ईर्षा दोन्ही बाजूंना असताना प्रशासनाकडून ही चूक कशी होऊ शकते ?

सहकार आणि राजकारणाची शिखर संस्था असणाऱ्या ‘गोकुळ’ च्या निवडणुकीसाठी माजी आमदार महादेवराव महाडिक आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ठरावधारकांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी दोन्ही बाजूने साम- दाम- दंड या साऱ्या पर्यायांचा वापर केला गेला आहे. अशातच आता ही घटना समोर आल्याने ही निवडणूक आता कोणते वळण घेणार, याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.