कोल्हापूर  (प्रतिनिधी) : वाढत्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वळीवडे (ता.  करवीर) येथील ग्रामदैवत श्री विठ्ठल बिरदेव त्रैवार्षिक यात्रा रद्द करण्यात आली आहे. याबाबतचा  निर्णय ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

वर्गणी न काढता, डिजिटल फलकाला फाटा देत केवळ  धार्मिक विधी करत यात्रा साधेपणाने होणार  आहे. ५  ते ९  एप्रिलअखेर होणाऱ्या धार्मिक विधीचा खर्च  ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी सरपंच भगवान पळसे व प्रा. डॉ. प्रवीण जाधव यांनी दिली.

पै पाहुण्यांना व मित्रमंडळींना यात्रेसाठी निमंत्रित करण्यात येऊ नये, असे आवाहन माजी उपसरपंच मधुकर साळोखे,  प्रकाश शिंदे,  राजू कुसाळे,  संजय चौगुले यांनी केले.  यावेळी सरपंच अनिल पंढरे, पोलीस पाटील दीपक पासाण्णा,  उमेश शिंगे,  योगेश खांडेकर,  ग्रामपंचायत सदस्य, रयत मानकरी, धनगर समाज व  ग्रामस्थ उपस्थित होते. विक्रम मोहिते यांनी स्वागत केले. ग्रामविकास अधिकारी बी. डी. पाटील यांनी आभार मानले.