पंढरपूर (प्रतिनिधी) : दररोजच्या जीवनातील थकवा घालवण्यासाठी सर्वजण विश्रांती घेतात. हीच अवस्था देवाची देखील होत असेल का? या विश्रांतीसाठीच सध्या विठुराया चक्क एक महिन्याच्या सुट्टीवर आहे. गेल्या शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आजही पाळली जात आहे.

या परंपरेनुसार सांगितले जाते की, मार्गशीर्ष महिना हे देवाचा विश्रांती काळ असून, चंद्रभागेच्या तीरावर निर्जन आणि निसर्गरम्य अशा विष्णूपदावर देव सुट्टीसाठी येत असतो. आषाढी यात्रेनंतरचा चातुर्मास आणि त्यानंतर आलेली कार्तिक यात्रा यामुळे शिणलेला विठुराया मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतीक्षेत असतो आणि हेमंत ऋतूचे वेध लागताच देवालाही विष्णुपदावर येण्याची ओढ सुरु होते. गेल्या शेकडो वर्षांपासून दरवर्षी कार्तिक वद्य अमावास्येला विठुराया येथे सुट्टीवर येतात आणि तब्बल महिनाभर विश्रांती घेऊन मार्गशीर्ष वद्य अमावास्येला पुन्हा वाजत गाजत मंदिराकडे परततात.

विठुराया मंदिरातून विष्णुपदावर आल्याने देवाचे मंदिरात होणारी नित्यपूजा, धुपारती, शेजारती, सकाळच्या खिचडीचा, दुपारचा महानैवेद्य आणि रात्रीचा बालभोग नैवेद्य याच ठिकाणी दाखविले जातात. यंदा परतीच्या पावसाच्या दणक्यानंतर अजूनही चंद्रभागेच्या पात्रात भरपूर पाणी असल्याने विष्णुपदावर दर्शनासाठी येताना भाविकांना घोटाभर पाण्यातून जावे लागते व यावेळी प्रत्येक भाविकांचे पाय धुतले जाऊन देवाचे दर्शन होते.