लाखोंचा गंडा घालणाऱ्या ‘व्हिजन अॅग्रो’च्या विकास खुडेला अटक

0
81

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अनेक बेरोजगार तरुणांना जादा परताव्याचे आमिष दाखवून ८४ लाख ५६ हजार २०० रुपयांची फसवणूक करून फरारी झालेल्या व्हिजन ग्रीन अॅग्रो प्रॉडक्टस व वी अँड के अॅग्रो प्रॉडक्ट या कंपनीचा सूत्रधार विकास जयसिंग खुडे (वय ३२, रा. पोर्ले, ता. पन्हाळा) हा बुधवारी रात्री स्वतःहून पोलिसात हजर झाला. आज न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आणखी तिघे फरारी आहेत.

विकास खुडे याने कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर येथील एका इमारतीमध्ये व्हिजन ग्रीन अॅग्रो प्रॉडक्टस व वी अँड के अॅग्रो प्रॉडक्ट नावाच्या कंपन्या तयार केल्या होत्या. त्याने व त्याच्या संचालक मंडळाने या कंपन्यांद्वारे सर्वसामान्य नागरिकांसह सुशिक्षित बेरोजगार लोकांना जादा परताव्याचे आमिष दाखवून हजारो लोकांकडून लाखो रुपयांची रक्कम घेतली होती. मात्र या रकमेचा परतावा न देता खुडेसह सर्व जण अचानक गायब झाले होते. त्यानंतर राजू बळीराम सूर्यवंशी (वय ४८, रा. लक्षतीर्थ वसाहत कमानीजवळ) यांनी गुंतवणूकदारांची ८४ लाख ५६ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या कंपनीचा सूत्रधार विकास जयसिंग खुडे, त्याची पत्नी विद्या, संचालक प्रसाद आनंदराव पाटील (रा. शिवाजी पेठ) सुशील शिवाजी पाटील रा. यवलूज, ता. पन्हाळा) व डॉ. तुकाराम शंकर पाटील रा. माजगाव ता पन्हाळा या पाच जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती.

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या फसवणूक प्रकरणातील सुशील पाटील याला सप्टेंबर महिन्यात अटक केली होती. विद्या खुडे, प्रसाद पाटील, डॉ. तुकाराम पाटील  हे तिघे अद्यापही फरारी आहेत.