कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाने नेहमीच गुणवत्तेला महत्त्व दिले आहे. सर्व उत्‍पादनांची गुणवत्‍ता राखण्‍यासाठी संघाने ISO बरोबर BIS स्‍टँडर्डसाठी नोंदणी केली असून दूध उत्‍पादकांना त्‍यांच्‍या गाई व म्हशींसाठी चांगल्‍या गुणवत्‍तेचे पशुखाद्य उपलब्‍ध केले जाईल. वीस लाख लिटर दूध संकलन उद्दिष्ट पूर्ण करण्‍यासाठी संघाच्‍या सर्व विभागांनी नियोजन करावे, अशी सूचना चेअरमन विश्वास पाटील यांनी केली. ते आज (मंगळवार) संकलन विभागाच्या कामकाज आढावा बैठकीत बोलत होते.

चेअरमन पाटील यांनी या बैठकीत अनेक सूचना केल्या. ते म्हणाले की, संघाकडून जनावरांना त्‍यांच्‍या शरीर पोषणाबरोबर दूध वाढीसाठी महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्‍यामध्‍ये टी.एम.आर. ब्‍लॉक, फर्टीमिन प्‍लस, सिल्‍वर रेशन पॅलेट व लहान वासरांसाठी मिल्‍क रिप्‍लेसर, काफ स्‍टार्टर व फिडींग पॅकेज उत्‍पादित केले जाते. पुढील काळात जास्‍तीत जास्‍त म्हैस दूध उत्‍पादनाचा टप्‍पा ओलांडण्‍यासाठी व्‍यवस्थापनाने विशेष खबरदारी घेतली पाहिजे. म्‍हैस दूध उत्‍पादन वाढीसाठी दूध उत्‍पादकांना विविध प्रकारच्‍या सेवा सुविधा देण्‍यावर भर दिला पाहिजे. संकलन  वाढीशिवाय वर्षभरात १,००० लिटरने दुधाची वाढ त्‍यांच्‍या नियंत्रणाखाली असणाऱ्या दूध संस्‍थेमधून झाली पाहिजे, असे उद्दिष्‍ट विस्‍तार सुपरवायझरना घालून दिलेले आहे. तसेच वीस लाख लिटर दुधाचे संकलन पूर्ण करण्‍यासाठी संघाच्‍या सर्व विभागांमार्फत नियोजन करावे.

या वेळी कोल्‍हापूर विभाग, गडहिंग्‍लज चिलिंग सेंटर, बिद्री चिलिंग सेंटर उदगाव सॅटेलाईट डेअरी, गोगवे चिलिंग सेंटर, तावरेवाडी चिलिंग सेंटर या सर्व सेंटरचे सुपरवायझर उपस्थित होते. त्यावेळी विभागनिहाय आढावा घेण्‍यात आला.

ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचेसह सर्व संचालकांनी दूध उत्‍पादन वाढीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर, ‘संकलन’चे व्‍यवस्‍थापक शरद तुरंबेकर, सहा. व्‍यवस्‍थापक डी. डी. पाटील आदी उपस्थित होते.