विशाळगड अतिक्रमणाचा विषय ८ दिवसांत मार्गी लावू : पालकमंत्री

0
55

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे, समाधी यांची दुरवस्था, पुरातत्व खात्याचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभाग यांची ८ दिवसांच्या आत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावू, असे आश्‍वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (मंगळवार) कृती समितीला दिले.

विशाळगड येथील अतिक्रमणाबाबत विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी कृती समितीला आश्वासन दिले. यावेळी दिलेल्या निवेदनात आजपर्यंत विशाळगडावर झालेले अतिक्रमण, मंदिरे-समाध्यांची दुरवस्था याला कारणीभूत असणार्‍या पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, गडावरील अतिक्रमणे जोपर्यंत पूर्णपणे हटत नाहीत, तोपर्यंत पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांनी विशाळगडाला सप्ताहातून एकदा भेट द्यावी आणि तेथील अहवाल पारदर्शीपणे शासनाला सादर करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी श्री महालक्ष्मी भक्त समितीचे प्रमोद सावंत, शिवसेनेचे किशोर घाटगे, कृती समितीचे प्रवक्ता सुनील घनवट, समन्वयक किरण दुसे, हिंदू जनजागृती समितीचे आदित्य शास्त्री, बाबासाहेब भोपळे आदी उपस्थित होते.