कोल्हापूर (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांची बंद केलेली मेडिकल योजना तातडीने सुरू करावी, बांधकाम कामगारांना दिवाळीला १० हजार रुपयांची दिवाळी भेट मिळावी, या प्रमुख मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने दि. ५ नोव्हेंबर रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आज (मंगळवार) संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. भरमा कांबळे आणि जिल्हा सचिव कॉ. शिवाजी मगदूम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे १० हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम पडून आहे. त्याचे वर्षाला ९०० ते १००० कोटी रुपये व्याज येते. व्याजाइतके पैसे सुद्धा बांधकाम कामगारांसाठी खर्च केले जात नसल्याचे यावेळी भरमा कांबळे यांनी सांगितले. उलट सुरू असलेल्या चांगल्या योजना बंद केल्याने कामगारांना उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांची बंद केलेली मेडीकल योजना तातडीने सुरू करावी, आणि येत्या दिवाळीला १० हजार रुपयांची दिवाळी भेट द्यावी यासह इतर मागण्यांसाठी दि. ५ नोव्हेंबरला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष कॉ. चंद्रकांत यादव, प्रकाश कुंभार, भगवानराव घोरपडे, संदीप सुतार, आनंद कराडे, मनोहर सुतार, रामचंद्र निर्मळे, विजय कांबळे, अशोक सुतार, शिवाजी कांबळे, दत्ता गायकवाड, बापू कांबळे, अरंजय पाटील उपस्थित होते.