कोल्हापूर (प्रतिनिधी) : रिपब्लिकन पार्टीच्या वतीने हाथरस प्रकरणी दसरा चौकात जोरदार निदर्शने करत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी हाथरस येथील दलित मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील दलित मुलीवर अत्याचार करून अमानवी कृत्य केल्याच्या निषेधार्थ आज (गुरुवार) दसरा चौकात रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. दरम्यान कार्यकर्त्यांनी येथे ठिय्या मांडून या अमानुष घटनेसह उत्तर प्रदेश सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी ‘दलित मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे’, ‘रिपब्लिकन पार्टीचा विजय असो’, ‘उत्तर प्रदेश सरकार हाय हाय’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तर या प्रकरणाचा खटला तात्काळ न्यायालयात चालवून अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, पिडीत कुटुंबाला युपी सरकारने भरीव आर्थिक मदत करवी,या सर्व घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी, या प्रकरणी दोषींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसासह अन्य मागण्या करण्यात आल्या.

आंदोलनात सतीश माळगे, निवास कांबळे, जानबा कांबळे, चरणदास कांबळे, बाबसो कांबळे, किरण नामे, कुंडलिक कांबळे, प्रविण निगवेकर, नितीन कांबळे, सात्ताप्पा कांबळे यांच्यासह रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.