नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्राच्‍या अग्निपथ योजनेच्‍या विरोधात सलग तिसऱ्या दिवशी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये तरुण आंदोलन करत आहेत. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात आंदोलकांनी रेल्वे गाडीला आग लावण्यात आली. रेल्वेला आग लावण्यात आल्यानंतर इतर डब्यांना आग लागू नये यासाठी पोलीस हाताने डबे ढकलत होते. यामध्ये त्यांना यशही मिळाले आणि इतर डबे सुरक्षित राहिले.

बिहारमध्‍ये तिसऱ्या दिवशीही हिंसक निदर्शने सुरू आहेत. राज्याच्या १३  जिल्ह्यांतून या योजनेचा विरोध होत असून, यावरुन मोठ्या प्रमाणात गदारोळ सुरू आहे. समस्तीपूर आणि लखीसराय येथे आंदोलकानी पॅसेंजर गाड्या पेटवून दिल्या. त्याचवेळी बक्सर आणि नालंदा येथे रेल्वे रुळांवर जाळपोळ करण्यात आली आहे. जाळपोळीनंतर आराहमधील रस्ता जाम झाला आहे.

वैशाली येथील हाजीपूर रेल्वे स्थानकावर संतप्त विद्यार्थ्यांनी तोडफोड केली. समस्तीपूरमध्ये आंदोलकांनी जम्मू तवी-गुवाहाटी एक्सप्रेस ट्रेन पेटवून दिली. या आगीत ट्रेनच्या दोन बोगी उद्ध्वस्त झाल्या. हाजीपूर-बरौनी रेल्वे सेक्शनच्या मोहिउद्दीननगर स्टेशनवरही जाळपोळ करण्यात आली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून आंदोलक ट्रॅकवर उभे आहेत. रेल्वेने सर्वत्र गाड्या थांबवल्या आहेत. अनेक ठिकाणच्या गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

खगरियामध्येही पुन्हा निदर्शने सुरू झाली आहेत. मानसी जंक्शनवर आंदोलकांची गर्दी झाल्याची पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने तिन्ही सैन्यात भरतीसाठी केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात विद्यार्थी संतप्त झाले आहेत. समस्तीपूरमध्ये आंदोलकांनी जम्मू तवी-गुवाहाटी एक्सप्रेस पेटवून दिली. यामध्ये रेल्वेच्या दोन बोगी उद्ध्वस्त झाल्या आहेत. पेटलेल्या बोगींमध्ये एसी कोचचा समावेश आहे. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

आराच्या बिहियामध्ये शुक्रवारी पुन्हा गोंधळ सुरू झाला आहे. तेथेही आंदोलकांनी तोडफोड केली आहे. त्याचवेळी मुंगेरमधील कृष्णा सेतू पुलावर अनेक तरुण जमा झाले असून, रास्ता रोको करून घोषणाबाजी देखील करत आहेत. त्यामुळे मुंगेर ते खगरिया बेगुसराय, भागलपूर आणि पाटणा या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.