वाघुर्डेतील नाईक कुंटूंबाकडून न्यायालयीन बंदी आदेशाचा भंग : फिर्याद दाखल

0
32

कळे (प्रतिनिधी) : वाघुर्डे (ता.पन्हाळा) येथे न्यायालयाच्या बंदी आदेशाचा भंग करून चुलता आणि पुतण्याला जखमी करण्याची घटना घडली. तुकाराम महादेव नाईक, रंगराव महादेव नाईक आणि सोनाबाई रंगराव नाईक यांच्याविरोधात मारुती रामा नाईक यांनी कळे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नाईक कुटुंबियांचा गट क्रमांक५९५/१ या शेतजमीनवरून वाद आहे. मारूती नाईक यांनी त्यांचे पुतणे तुकाराम आणि रंगराव यांना या शेतजमिनीत कायमस्वरूपी मनाई बंदी होण्यासाठी कळे-खेरीवडे न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याचा निकाल मारुती नाईक यांच्या बाजूने लागला असून आरोपी आणि इतरांना कायमस्वरूपी मनाई बंदी आदेश पारीत केला आहे. या आदेशाचा भंग करून जबरदस्तीने भात रोप लागण करायला लागले होते. दरम्यान, तुम्ही आमच्या शेतात चिखल करून रोपे का लावता,  असे मारुती नाईक यांनी विचारले असता तुकाराम, रंगराव यांनी मारुती आणि त्यांचा मुलगा भगवान यांना खोरे, काठीने मारहाण केली. तसेच सोनाबाई नाईक यांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद मारुती नाईक यांनी दिली आहे.