मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण मराठा समाजाच्या विरोधात निर्णय घेतले. त्यांची समितीतून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी करीत चव्हाण यांना ‘विश्वासघातकी’ हा पुरस्कार दिला जाणार असल्याचा टोला शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी लगावला. तसेच मराठा आरक्षणासाठी २ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

ते आज (गुरुवार) मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठीच्या आयोजित बैठकीत बोलत होते. या बैठकीला २४ जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत १०२ व्या घटनादुरुस्तीबाबत जो कायदा करण्यात आला आहे, त्याबाबत बैठकीत चर्चा झाली. राज्य सरकार याबाबत काहीच पावलं उचलत नसल्याचा आरोप करीत सरकारबाबत संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये बहुतांश लोकं मराठा समाजाच्या विरोधात काम करणारे आहेत. मुळात आयोगावरील लोकांना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. मात्र लोणावळा येथे आयोजित एका ओबीसी समाजाच्या बैठकीला ही मंडळी गेली होती. तिथे त्यांनी भाषणं देखिल केली होती. आम्ही आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव पास केला. कारण त्यांनी त्यांच्या संस्थेत १ वर्षे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केलं आहे, असं मेटे यांनी यावेळी सांगितलं.

संपूर्ण राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २ सप्टेंबर रोजी आंदोलन केलं जाणार आहे. ७ किंवा ८ सप्टेंबरला एक राज्यव्यापी बैठक घेणार आहोत. त्यानंतर मुंबईत गणपती विसर्जनानंतर महामोर्चा काढणार आहोत. आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असाही इशारा मेटे यांनी यावेळी दिला.