‘वारणा’, ‘चांदोली’ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी मंगळवारपासून गावनिहाय भेटी…

‘वारणा’, ‘चांदोली’ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी मंगळवारपासून गावनिहाय भेटी...

0
625

हुपरी (प्रतिनिधी) :  हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्येंबाबत खासदार धैर्यशील माने यांनी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत मंगळवार (दि. २९) पासून गावनिहाय भेटी देवून नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, असे परिपत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी आज (शनिवार) काढले आहे.

खा. धैर्यशील माने यांनी चांदोली अभयारण्य व वारणा प्रकल्प संघटनांतील पदाधिकारी आणि गौरव नायकवडी यांच्यासोबत घेऊन अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्याबरोबर बैठक घेतली होती. यामध्ये वसाहतींचे विविध प्रलंबित प्रश्न मांडले होते. तसेच प्रत्येकी सोळा वसाहतीमध्ये समक्ष जाऊन प्रश्न सोडवण्याबाबत सांगितले होते.

या बैठकीनंतर आज जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वसाहतींमध्ये जाण्यासाठी परिपत्रक काढले आहे. यामध्ये वसाहतींनुसार जमीन आणि भूखंड वाटपाबाबत प्रलंबित कामकाजाचा आढावा घेऊन कारवाई करणे, वसाहतीमध्ये ज्या नागरी सुविधा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत त्या जि.प.कडे हस्तांतरित करणे, पूर्ण असलेल्या सुविधांमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास ती करणे, तसेच अपूर्ण असलेल्यां सुविधा पूर्ण करण्याच्या अनुषंगाने पाहणी करणे,वसाहतींमधील लोकसंख्येप्रमाणे ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबतचे निकष तपासून वसाहतीमध्ये ग्रामपंचायती स्थापन करणे,वसाहतीनिहाय स्वतंत्र ७/१२ तयार करणे आदी परिपत्रकात म्हटले आहे.

यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आपापले प्रलंबित प्रश्न घेऊन आपल्या गावातील नियोजित बैठकीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन खा. धैर्यशील माने यांच्याकडून करण्यात आले आहे.