कोल्हापूर (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील ४९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज (शुक्रवार) सकाळी ८ वाजल्यापासून १५६ केंद्रावर मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहावयास मिळत आहेत. तालुक्यात सकाळी २.३० वाजेपर्यंत ५० टक्के मतदान झाले असून मतदान प्रकिया सुरळीत सुरू असल्याचे तहसिलदार रमेश शेंडगे यांनी सांगितले.

तालुक्यात ४३ ग्रामपंचायतीपैकी यापूर्वी ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आज प्रत्यक्षात ३९ ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. तर ३२४ जागेसाठी एकूण ७७४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तसेच तालुक्यात १२८ वॉर्ड असून १५६ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी सुमारे १ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करूनच मतदारास मतदान केंद्रात प्रवेश दिला जात आहे. दरम्यान पन्हाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक फडतरे यांनी स्वतः सकाळी वाघवे येथील मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली.