विजय भोजे अखेर पोलीस ठाण्यात हजर ;  न्यायालयीन कोठडीत रवानगी

0
403

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विनयभंगाच्या गुन्हयात संशयित असलेले कोल्हापूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय भोजे आज (सोमवार) सकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले. पोलिसांनी भोजेंना ताब्यात घेऊन व्ही. सी. द्वारे न्यायालयासमोर हजर असताना त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. भोजे यांनी २०१९ पासून आतापर्यंत प्रत्यक्ष व दूरध्वनीवरुन अश्लील बोलून विनयभंग केल्याची तक्रार एका महिला अधिकाऱ्याने दाखल केली होती.

काही दिवसापूर्वी विजय भोजे यांच्यावर जिल्हा परिषदेतील एका महिला अधिकाऱ्याने विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. दरम्यान भोजे यांनी त्यांच्या विरोधातील तक्रार ही चुकीचे असून यासंबंधी कोर्टात दाद मागू. शिक्षण विभागातील भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून माझ्याविरोधात फिर्याद दिल्याचे म्हटले होते. सुमारे २० दिवसांपासून भोजे फरार होते. अखेर आज सकाळी विजय भोजे शाहूपुरी पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाल्यानंतर व्हीसीद्वारे त्यांना न्यायालयासमोर हजर केले. त्यांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने भोजे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक स्मिता पाटील अधिक तपास करीत आहेत.