कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने भ्रष्टाचार विरोधी जनजागृती होण्यासाठी २६ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. अशी माहिती आज (सोमवार) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिलीय.

भ्रष्टाचारा विरुद्ध जनजागृती व्हावी उद्देशाने केंद्रीय सतर्कता आयोगाच्या निर्देशानुसार स्वतंत्र भारत @ ७५ सत्यनिष्ठा से आत्मनिर्भरता ही संकल्पना घेवुन दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले जाणार आहे. केंद्रीय दक्षता आयोग नवी दिल्ली यांनी राज्य शासनास कळविले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रनाखालील सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था स्वायत्त संस्थामार्फत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. सकाळी ११ वाजता भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेवून सप्ताहाची सुरवात करण्यात येणार आहे.

यामध्ये आकाशवाणी, एफ.एम. रेडीओ, स्थानिक वृत्तपत्रे, केबल चॅनेल, व्हॉटस अप ग्रुप, यु टयुब चॅनेल, एस.एम.एस., ई मेल या व इतर प्रसार माध्यमांच्या मदतीने जनजागृती सप्ताहाबाबतची पार्श्वभूमी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यपध्दती विषद करुन नागरिकांना भ्रष्टाचाराविरुध्द लाचेच्या तकारी देण्यासाठी आवाहन करणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यपध्दती विषयीची माहिती असलेल्या पत्रकांचे संपुर्ण कोल्हापूर जिल्हयात वाटप करणे, पोलीस दलाकडील स्किनची सुविधा असलेल्या मोबाईल व्हॅनच्या मदतीने भ्रष्टाचाराविरूध्दच्या विविध चित्रफिती जिल्हयात दाखवण्यात येणार आहे.

जिल्हयातील सर्व प्रमुख शासकिय कार्यालये, रिक्षा स्टॅन्ड, एसटी स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन तसेच शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची घोषवाक्ये असलेली पत्रके, भिंतीपत्रके, बॅनर लावण्यात येणार आहेत. कामगार संघटना, एमआयडीसीतील कारखान्यांना भेटी देवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेताना काही अडचणी येतात का ? या बाबत संस्थेचे प्रतिनिधी यांचे समवेत चर्चा करून त्यांचेकडे लाचेची मागणी होते काय या बाबत विचारपूस होणार आहे. तसेच निंबध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असे विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत.