महापालिका निवडणूक रिंगणात उतरणार दिग्गज..!

0
399

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण निश्चित झाल्याने कोणत्याही परिस्थितीत रिंगणात उतरण्याचा निर्धार केलेल्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना स्वतंत्रपणे लढण्याच्या मानसिकतेत असल्याने सर्वच प्रभागात उमेदवारांची भाऊगर्दी होणार आहे. यामुळे इच्छुकांनी आतापासूनच मतदारांशी संपर्क वाढवला आहे.

प्रभाग आरक्षणात अनेक दिग्गज, प्रस्थापितांना धक्का बसला आहे. तरीही त्यांनी आजूबाजूच्या प्रभागातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. विद्यमान महापौर निलोफर आजरेकर यांच्याऐवजी त्यांचे पती आस्कीन तर राजारामपुरीतील तवनाप्पा पाटणे हायस्कूल प्रभागात राष्ट्रवादीकडून मुरलीधर जाधव, शिवसेनेकडून महेश उत्तुरे, अभिजित पाटील रिंगणात असतील. फिरंगाई तालीम प्रभागातील लढत लक्षवेधी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना उत्तरचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले विरुद्ध त्यांचा चुलतभाऊ अजय इंगवले यांच्यात लढत होईल. शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर प्रभागातून इंद्रजित बोंद्रे, प्रकाश सरनाईक रिंगणात असतील. नेहमी चर्चेत असलेले नगरसेवक भूपाल शेटे सुभाषनगर प्रभागातून निवडणूक लढवतील. त्यांच्या विरोधात भाजप-ताराराणीकडून सतीश घोरपडे असतील.

कदमवाडी प्रभागात काँग्रेस विरूध्द भाजप, ताराराणी आघाडी अशी थेट लढत होईल. आघाडीकडून विद्यमान नगरसेवक सत्यजित कदम तर काँग्रेसचे दीपक शेळके यांच्यात लढत होईल. येथे अन्य पक्षाचे कोण उमेदवार असतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सदर बाजार प्रभाग अनेक वर्षे आरक्षित होता. तो या वेळी खुला झाला आहे. येथे राष्ट्रवादी विरुद्ध इतर पक्षांचे उमेदवार अशी लढत होईल. राष्ट्रवादीकडून राजेश लाटकर, भाजप-ताराराणी आघाडीकडून मारूती माने यांचेसह वंचित बहुजन आघाडी, शिवसेनेचाही उमेदवार राहील. साने गुरुजी वसाहत प्रभागातून काँग्रेसकडून शारंगधर देशमुख विरुद्ध भाजपचे संजय सावंत यांच्यात लढत होईल. प्रमुख प्रभागातील लढतींचे प्राथमिक चित्र आहे. आहे. सर्वच प्रभागात प्रमुख पक्षांनी तुल्यबळ उमेदवार देण्याची तयारी केली आहे. यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे.