‘पुणे पदवीधर, शिक्षक’ मतदारसंघासाठी दिग्गजांनी केले मतदान…

0
69
पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजप व मित्रपक्षांचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी कडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावर मतदान केले.

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २८१ केंद्रांवर आज (मंगळवार) सकाळपासून मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. जिल्ह्यातील दिग्गज नेते, शासकीय अधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

भाजपा प्रदेशाध्यक्ष, आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास कोल्हापुरातील महाराष्ट्र हायस्कूल येथील केंद्रावर मतदान केले. कागल येथील सर पिराजीराव विद्यामंदिर केंद्रात ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी मतदान केले. 

पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी कडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावर मतदान केले. शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांनी कुडित्रे (ता. करवीर) येथील कुमार विद्यामंदिर येथील केंद्रावर मतदान केले.

आ. राजेश पाटील यांनी पत्नी सुश्मिता पाटील यांच्यासह कोवाड येथे मतदान केले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कुटुंबियांसहित जुना बुधवार पेठेतील बाबासाहेब आंबेडकर शाळेतील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी न्यू मॉडेल हायस्कूल या केंद्रावर मतदान केले. भाजपचे माजी आमदार अमल महाडिक आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी हेर्ले (ता. हातकणंगले) येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.