ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ काळाच्या पडद्याआड…

0
246

पुणे (प्रतिनिधी) : ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ (वय ७९) यांचे आज (गुरुवार) दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. आपल्या सहजसुंदर अभिनयासाठी ते प्रसिद्ध होते. ‘झपाटलेला’ या महेश कोठारे दिग्दर्शित सिनेमात त्यांनी साकारलेली ‘बाबा चमत्कार’ ही भूमिका खूपच गाजली होती. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी एका गुणी अभिनेत्याला मुकल्याची भावना व्यक्त होत आहे.

१९४३ साली एका कन्नड कुटुंबात जन्मलेल्या राघवेंद्र कडकोळ यांची मातृभाषा जरी कन्नड असली तरी ते मराठी सफाईदारपणे बोलत असत. महाविद्यालयात शिकत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे घरातील आर्थिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. उदरनिर्वाहासाठी त्यांनी जंगल खात्यात टायपिस्ट म्हणून सरकारी नोकरी मिळवली.

नोकरी करत असताना राघवेंद्र यांनी रंगभूमीवर पडद्यामागे कलाकारांना निरोप देणे, चहा देणे, खुर्च्या मांडणे अशी मिळेल ती कामे स्वीकारली. परंतु एक कलाकार म्हणून त्यांनी कधीच कोणासमोर काम मिळवण्याची मागणी केली नाही. ‘करायला गेलो एक’ हे पहिले व्यावसायिक नाटक त्यांनी साकारले. महिन्यातून २०-२२ दिवस नाटकांचे दौरे असल्याने नोकरीवर परिणाम होऊ लागला. त्यामुळे नोकरीवर त्यांना पाणी सोडावे लागले होते.

‘अश्रूंची झाली फुले’ नाटकातील ‘धर्माप्पा’ ही भूमिका राघवेंद्र यांच्याकडे ओघाने आली. एक कानडी व्यक्ती मराठी कसे बोलतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे धर्माप्पा. त्यांच्या या भूमिकेचे विशेष कौतुक देखील झाले. धोंडी, देवदासी, हसुया पण कायद्याच्या कचाट्यात, रायगडाला जेव्हा जाग येते सारख्या चित्रपट नाटक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. रंगभूमीवर त्यांनी काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर यासारख्या दिग्गज कलावंतांसोबत काम केले.

कडकोळ यांनी कृष्णधवल चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी मराठी सिनेमात कामे करण्यास सुरुवात केली. निळू फुले, श्रीराम लागू, दादा कोंडके, अरुण सरनाईक, विलास रकटे यांच्यासह लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, महेश कोठारे, अशोक सराफ यांचेबरोबर अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या. चांडाळचौकडी, कुठे कुठे शोधू मी तुला, पळवापळवी, झपाटलेला, झपाटलेला २ हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट होत. कानडी हेल काढून मराठी संवाद म्हणण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांची ती शैली विशेष लोकप्रिय होती.

पण या अभिनेत्यावर त्यांच्या अखेरच्या काळात हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करण्याची वेळ आली प्रसिद्धी मिळाली, मात्र पैसे कमावता आला नाही याची खंत त्यांना शेवटपर्यंत लागून राहिली होती. ते पत्नी लतिका कडकोळ यांच्यासोबत पुण्यातील बावधन येथील पालाश एल्डरली केअर अँड रिकव्हरी सेंटर येथे राहात होते. वृद्धापकाळाने आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.