टोप (प्रतिनिधी) : फाउंड्री उद्योगाचे भीष्माचार्य, ज्येष्ठ उद्योजक आणि झंवर ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक अध्यक्ष रामप्रताप झंवर यांचे आज (सोमवार) अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

रामप्रताप झंवर यांचा जन्म इचलकरंजी येथे त्यांच्या आजोळी ३ फेब्रुवारी १९३५ ला झाला. आष्टा (जि. सांगली) हे त्यांचे मूळ गाव. पुणे इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी बी.ई मेकॅनिकल ही पदवी घेतली. दीडशे रुपये मासिक पगारावर त्यांनी किर्लोस्करवाडी येथील किर्लोस्कर ब्रदर्समध्ये नोकरी केली. १९६६ मध्ये प्रोडक्शन इन्चार्ज या पदावर असताना त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी फाय फाऊंडेशनच्या पंडितराव कुलकर्णी यांनी त्यांना प्रेरणा दिली होती. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर रामप्रताप झंवर यांनी पंडितराव कुलकर्णी व श्रीकांत साखरपे अशा तिघांच्या भागीदारीत इंजीनियरिंग डेव्हलपमेंट हा उद्योग उद्यमनगर येथे सुरू केला. १९७० मध्ये याचे रूपांतर इलेकॉन्ट इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये झाले.

कोल्हापूरची नामांकित कंपनी असा नावलौकिक इलेकॉन्टने मिळवला. काही अंतर्गत व्यवसायिक कारणांमुळे भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये आर एस झेड या नावाने त्यांनी स्वतःच्या मालकीचे पहिले युनिट १९८२ मध्ये सुरू केले. १९८५ मध्ये श्रीराम फाउंड्री या झंवर ग्रुपमधील नामांकित फौंड्री उद्योगाची सुरुवात झाली.

सध्या झंवर ग्रुपध्ये सहा फौंड्री उद्योग व नऊ मशीनशॉपचा समावेश आहे. कागल – हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये झंवर ग्रुपने ‘कस्तुरी’ नावाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला आहे. याशिवाय उत्तरांचल येथेही या ग्रुपचा मोठा उद्योग सुरू आहे. आज या ग्रुपमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सुमारे चार हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी कस्तुरीबेन, मुलगा नरेंद्र, सून सौ. नीताबेन, नातू नीरज व रोहन, नातसुना जिया व अंकिता, पंतू असा परिवार आहे.