कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंधन दरवाढ तसेच कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटना आणि अखिल भारतीय किसान सभेने आज (शुक्रवार) भारत बंदचे आवाहन केले होते. या बंदला कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातही सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. काँग्रेसने या बंदला पाठिंबा दिला होता. भाजप वगळता भाकप, शेकाप, माकप, जनता दल यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात बंदला अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला. कोल्हापुरातील मुख्य बाजारपेठ असलेला महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी धान्य बाजार या ठिकाणी व्यवहार सुरळीत सुरु होते. त्यामुळे नागरिकांना बंदचा काहीही परिणाम जाणवला नाही. काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी बंदला पाठिंबा देत काँग्रेस भवनसमोर उपोषण केले.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती संयुक्त कामगार संघटना समन्वय समितीने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. केंद्र सरकारने शेतकरी आणि श्रमिकांचे जीवन उध्वस्त करणारे कायदे पारित करून तसेच अन्याय पद्धतीने इंधन दरवाढ केल्याने सामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर इंधन दर कमी करावेत आणि अन्यायी कृषी कायदे रद्द करावेत या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

या शिष्टमंडळात उदय नारकर, नामदेव गावडे, वसंतराव पाटील, एस. पी. पाटील, एस. बी. पाटील, सुभाष जाधव, रवींद्र जाधव, सतीशचंद्र कांबळे, शंकर काटाळे, अनंतराव कुलकर्णी यांचा समावेश होता. एकंदरीतच भारत बंदला जिल्ह्यामध्ये अतिशय अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.