नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांसह पर्यायी इंधनांनाही प्रोत्साहन देत आहे. परंतु पारंपरिक इंजिन असलेल्या वाहनांची नोंदणी थांबणार नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्हर्चुअली कार्यक्रमात ते बोलत होते.

इलेक्ट्रिक वाहनांना सरकार प्राधान्य देत आहे. त्याचबरोबर इथेनॉल, बायो-एलएनजी आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या पर्यायी इंधनांचा वापरही वाढवायचा आहे. परंतु ज्वलनशील इंधनावर चालणाऱ्या वाहनांची नोंदणी थांबवणार नाही. इलेक्ट्रिक वाहनांना लोकांकडून पसंती मिळू लागल्याने या वाहनांची विक्रीही वाढली आहे. सुमारे २५० स्टार्टअप ई-वाहनांच्या विकासामध्ये गुंतले आहेत आणि भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होतील. ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असेल. मी स्वतः पुढील महिन्यात हायड्रोजनवर चालणारी कार खरेदी करणार असल्याचे सांगून विमानात वापरल्या जाणार्‍या इंधनात ५० टक्के इथेनॉल वापरण्याचा प्रयत्न असेल.