कोल्हापूर (श्रीधर कुलकर्णी) : पावसाळयात घडणारे विविध अपघात पाहता प्रत्येकाने आपल्या वाहनाची काळजी घेण्याबरोबरच वाहन हळू चालवणे हा सर्वात मोठा चांगला उपाय आहे. ओल्या रस्त्यावर किंवा पाणी साचलेल्या रस्त्यावर वाहन चालवताना चालकाने वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे, असे मत ज्येष्ठ नागरिक ब निवृत्त बँक अधिकारी अरुण राजाज्ञा यांनी ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना व्यक्त केले.

राजाज्ञा म्हणाले, आता पावसाळा सुरु झाला आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटणे, भरधाव वाहनाने रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तीस धडक देणे, दोन वाहनांमध्ये धडक होऊन अपघात होणे, रस्त्यावर दुचाकी घसरून अपघाताच्या घटना घडत आहेत. यामुळे पावसाळ्यात बिनधास्त व बेशिस्त वाहन चालवून जीव धोक्यात आणण्यापेक्षा नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास केला पाहिजे.

पावसाळ्यात उड्डाणपूल, महामार्ग येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे वाहन एका रांगेतच चालवले पाहिजे. या वाहतूक कोंडीमध्ये वाहन चालकाने संयम ठेवून वाहन चालवणे गरजेचे आहे, असे सांगून ते म्हणाले, ओव्हरटेक करून अपघाताला निमंत्रण देऊ नये. बस, ट्रक अश्या मोठ्या वाहनांच्या मागून वाहन चालवत असताना विशिष्ट अंतर ठेवले पाहिजे, जेणेकरून पुढील वाहनाने रिव्हर्स गिअर घेतल्यावर ते वाहन मागच्या वाहनास धडकणार नाही.

प्रत्येकाला वेळेत पोहोचण्याची घाई असल्यामुळे वेगाने गाडी चालवून आपला मौल्यवान जीव धोक्यात घालत असतो. प्रत्येकाने पावसाळ्यात व इतर वेळेस सुद्धा वाहन चालवत असताना सतर्क राहून, संयम ठेवून व वाहतूक नियमांचे पालन करून गाडी चालवली पाहिजे. एखाद्या लहान-मोठ्या पुलावर पाणी आले असेल, तर पुराच्या पाण्यातून वाहन नेण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी सांगितले.

पावसाळ्यात वाहन चालवताना घ्यावयाची दक्षतेबाबत अरुण राजाज्ञा यांनी काही टिप्स दिल्या. ते म्हणाले, घरातून निघण्याआधी वाहनांची सुस्थिती तपासवी, आपल्या वाहनांची संपूर्ण तांत्रिक माहिती करून घ्यावी, बस, ट्रक यासारख्या मोठ्या वाहनांच्या मागून गाडी चालवत असताना अंतर ठेवावे, वाहनाच्या मागच्या बाजूला लाल परावर्तक व पुढच्या बाजूला पांढरे परावर्तक असणे आवश्यक आहे. वाहनाचे सर्व टायर चांगले आहेत याची खात्री करून घ्यावी. पावसाळ्यात गाड्यांचा अंदाज घेणे कठीण असते त्यामुळे सिग्नल फॉलो करूनच वाहन चालवावे. हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करणे विसरू नये. पावसाळ्यात धुक्यात वाहन चालवत असताना दिवसासुध्दा हेडलाईट चालू ठेवावी.

वाहनाचा ब्रेक, इंजिन, एक्सिलेटर, ऑईल, क्लच, टायर, बॅटरी या सर्व यंत्रणा सतत तपासणे गरजेचे आहे. चारचाकी चालकांनी तसेच रिक्षा व बस चालकांनी वाहन चालवताना समोरील काचेवर असणारे वाइपर सुव्यवस्थित आहे का? हे तपासणे गरजेचे आहे. पावसाळ्यात वाहनाचा वेग एकदम वाढवणे व एकदम ब्रेक दाबणे टाळावे, साचलेल्या पाण्यातून, वाहत्या पाण्यातून वाहन चालवणे टाळावे, विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये, असे ते म्हणाले

पावसाळ्यात फिरायला किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जात असताना वाहनांमध्ये शर्यत लावू नये, अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवू नये, वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलू नये, ऑटो लॉक गाड्यांमधून पावसात प्रवास करताना गाडीच्या काचा बंद करू नये, वाहतूक चिन्हांचे व संकेतांचे उल्लंघन करू नये, अशाही महत्त्वाच्या व उपयुक्त सूचना राजाज्ञा यांनी केल्या आहेत.