कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेली अडीच वर्ष सुरू असलेला विज्ञान विषय शिक्षक पदोन्नतीसाठी असलेला संघर्ष शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी लक्ष घातल्यामुळे मार्गी लागला. सर्व संघटनांनी साथ सोडली, पण शेवटपर्यंत राजाराम वरुटे व शिक्षक संघ पाठीशी राहिले. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे हा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला म्हणून विज्ञान विषय शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला.

पदोन्नतीचा प्रश्न सोडविल्यामुळे या ऋणातून उतराई होण्यासाठी शिक्षक बँकेच्या निवडणुकीत शिक्षक संघ प्रणित सत्तारूढ पॅनेलला विज्ञान विषयशिक्षक कृती समितीने पाठिंबा जाहीर केला. जि. प. कर्मचारी सोसायटी येथे अडीचशे विज्ञान विषयशिक्षकांसह इतर शिक्षक उपस्थित होते. गेली अडीच वर्ष सुरू असलेला संघर्ष आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले विज्ञान विषयशिक्षक ३५० च्यावर शिक्षकांना न्याय मिळाला आहे.

जिल्हा परिषदेच्या आडमुठ्या धोरणामुळे जिल्ह्यातील बहुतांश शाळात गेल्या ४ वर्षांपासून विज्ञान विषय शिक्षक नेमले नव्हते. शासन निर्णयाचा आधार घेत विज्ञानविषय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. विभागीय आयुक्त कार्यालय, मंत्रालय स्तरावर देखील पाठलाग केला; पण त्याला यश आले नाही. वरुटे यांनी संघटनेच्या निवेदनाखाली मंत्री मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा केला.

मुश्रीफ यांनी मंत्रालयात कोल्हापूर जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासमवेत बैठक लावली, पण वरुटेंना या बैठकीला बोलवण्याचे प्रशासनाने पत्र न काढल्यामुळे बैठक रद्द झाली. पुन्हा बैठक लावली आणि १९ मे २०२२ रोजी वरुटे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत विज्ञान विषय शिक्षक पदोन्नतीचा प्रश्न निकालात निघाला. वरुटे यांच्या रेट्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. या बैठकीला भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित होते.

विज्ञान विषय कृती समितीचे संजय रोगे म्हणाले, अडीच वर्ष प्रशासनाकडे हेलपाटे मारून जीव मेटाकुटीला आला होता.  केवळ शिक्षक बँकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक संघटनांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले; परंतु राजाराम वरुटे यांनी शिक्षकांच्या प्रश्नासाठी कधीच दुजाभाव केलेला नाही. वरुटे यांनी या प्रश्नात आम्हाला न्याय मिळवून दिला म्हणून संपूर्ण विज्ञान विषय शिक्षकांनी या निवडणुकीत सर्व ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी राहण्याचा ठाम निश्चय केला आहे.

यावेळी श्रीकांत माणगावकर, सुनील गुरव, संजय रोगे, दस्तगीर फकीर, शिवाजी सूर्यवंशी, मारुती सोनाळकर, नितीन बागुल, भगवान मुंडे, बी. आर. कांबळे, संदीप माने, विनायक पुंडफळ, अशोक देसाई, सागर तेली, किशोर पाटील, गजानन पाटील, विशाल देसाई, अजित पाटील, भरत गुरव शरद दिवसे आणि विज्ञान विषय शिक्षक उपस्थित होते.