कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा तसेच सायकल व तिरंग रॅली अमृत महोत्सावी दौड आणि हर घर तिरंगाचा प्रसार या उपक्रमांचा यात समावेश आहे.

शुक्रवार, दि. १२ रोजी दौड काढण्यात येणार असून, यात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह ६०० ते ७०० जण सहभागी होणार आहेत. पोलीस मुख्यालय, सीपीआर चौक, शिवाजी पुतळा, महालक्ष्मी मंदिर, ताराबाई रोड, रंकाळा टॉवर, गंगावेस, महापालिका, सीपीआर ते पोलीस मुख्यालय असा या दौडीचा मार्ग आहे. तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस मुख्यालयात ७५ सूर्यनमस्कार घालणार आहेत. दि. १२ ते १४ ऑगस्टपर्यंत सायबर पोलीस ठाण्याच्या वतीने पथनाट्याद्वारे ‘हर घर तिरंगा’ची जनजागृती केली जाणार आहे. शिवाय सायबर गुन्हे, वाहतूक नियम, महिला अत्याचाराबाबत जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी जनजागृती करून प्रबोधन केले जाणार आहे.

दि. १२ रोजी सायंकाळी पोलीस मुख्यालयमधील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह जलद कृती दल व दंगल नियंत्रक पथक यांच्या वतीने कोल्हापूर शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर पोलीस बँड पथकातर्फे नाना नानी पार्क, बिंदू चौक, महालक्ष्मी मंदिर, हुतात्मा पार्क, दसरा चौक व मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी देश भक्तीपर गीते सादर करून संचान करणार आहेत.

पोलीस मुख्यालयात दि. १२ रोजी चित्रकला व दि. १३ रोजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासाठी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी असे दोन गट केले आहेत. नागरिकांनी पोलीस दलाच्या या विविध उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनखाली राखीव पोलीस निरीक्षक सत्यवान मासळकर, पोलीस कल्याण विभागाकडील निरीक्षक अंबरिश फडतरे यांच्यासह अंमलदार सुनील जांभळे व अरुण कुसाळे हे प्रयत्नशील आहेत.