निवृत्ती मंडळातर्फे महाशिवरात्रीनिमित्त बुधवारपासून विविध कार्यक्रम…

0
34

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील ब्रह्मेश्वर बागेतील निवृत्ती तरुण मंडळातर्फे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १० ते १२ मार्च या कालावधीत ब्रह्मेश्वर मंदिर येथे हे कार्यक्रम होतील, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संजय शेळके यांनी दिली.

शेळके यांनी सांगितले की, १० मार्च रोजी रात्री ९ वाजता वेताळ देवाचे भजन होणार आहे. ११ रोजी सकाळी साडेसात वाजता ब्रह्मेश्वराला लघुरुद्र अभिषेक घालण्यात येणार असून सकाळी साडेनऊ वाजता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धा होईल. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने १० वाजता रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या शिवाय खोकल्याचे औषध, जंताच्या व ए व्हिटॅमिनच्या गोळ्या मोफत दिल्या जाणार आहेत. ११ वाजता खिचडी, ताक वाटप (पार्सल स्वरूपात) केले जाणार आहे.

दुपारी ३ वाजता संगीत खुर्ची स्पर्धा होईल. त्यानंतर श्री ब्रह्मेश्वर महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ५ वाजता फॅन्सी ड्रेस, रेकॉर्ड डान्स, वक्तृत्व स्पर्धा होतील. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप होईल. त्यानंतर रात्री ९ वाजता मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.

शुक्रवार दि. १२ रोजी दुपारी १२ ते ३ यावेळेत महाप्रसादाचे वाटप (पार्सल स्वरूपात) केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन अध्यक्ष शेळके यांनी केले आहे.