कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सावर्डे, मल्हारपेठ व मोरेवाडी या तिन्ही गावचे ग्रामदैवत असणाऱ्या सावर्डे येथील जोतिर्लिंग मंदिरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नऊ दिवस सकाळी काकड आरती होऊन जोतिबाची वेगवेगळ्या स्वरुपात पूजा बांधण्यात येते. सायंकाळी, भजन, कीर्तन व पालखी इत्यादींचे आयोजन केले जाते.

परिसरातील १५० भाविकांनी नवरात्रीचा उपवास धरला आहे. परिसरातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत आहेत. सोमवार, दि. ३ रोजी सावर्डे येथे जागर, दंडवत, रात्री लेझीम व मर्दानी खेळ, वाजंत्री व पारंपरिक वाद्यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजी व गुलालाच्या उधळणसहित जोतिबाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंगळवारी मानाच्या सासन काठ्यांचा कार्यक्रम व बुधवारी विजयादशमी दिवशी सीमोल्लंघनानंतर मल्हारपेठ येथे जागर होऊन जोतिबा पालखीचा सोहळा होणार आहे, अशी माहिती जोतिर्लिंग देवालयाचे पुजारी पांडुरंग गुरव यांनी दिली.