‘श्रीक्षात्र जगतगुरुपीठा’च्या विविध उपक्रमांना ११ नोव्हेंबरपासून प्रारंभ

0
138

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ११ नोव्हेंबर १९२० रोजी श्रीक्षात्र जगतगुरुपीठाची स्थापना केली. या घटनेस १०० वर्षे पूर्ण होत असून ही आपल्या सर्वांसाठीच आनंदाची अन अभिमानाची गोष्ट. यानिमित्त श्री क्षात्र जगतगुरु पीठ, पाटगांव यांच्या माध्यमातून हे वर्ष अनेक समाजाभिमूख उपक्रमांनी साजरे करण्याचे ठरविले आहे. ११ नोव्हेंबर रोजी छ. शाहू महाराज यांच्या हस्ते या समारंभाची सुरवात होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील आणि संजयसिंह बेनाडीकर यांनी आज (रविवार) पत्रकार परिषदेत दिली.

श्रीमत क्षात्र जगतगुरु महाराजांच्या विचारांचा देशात सर्वदूर प्रचार व प्रसार होवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे कार्य प्रामुख्याने करण्यात येणार आहे. याचबरोबरीने समाजाला स्वावलंबी तसेच सुसंस्कृत करणारे व आजच्या काळानुरुप बदल स्वीकारुन विविध समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन संपूर्ण वर्षभर श्री क्षात्र जगतगुरु पीठा मार्फत करण्यात येणार आहे.

छ. शाहू महाराजांनी आपल्या समाजाची सुधारणा आपणच केली पाहीजे व त्यासाठी सर्वसामान्य लोकांना ज्ञानाची मशाल दाखविली पाहीजे असा उद्देश ठेवला होता. त्यानूसार समाजातील तरुणांनी स्वत:च्या पायावर उभे राहिल्यावाचून मार्ग नाही आणि परिस्थितीशी जुळवून घेऊन टिकून राहिल्यास प्रगती होते, हे जगदगुरु महाराजांचे सुत्र होते. यास अनुसुरुनच समाजातील प्रत्येक वर्गास उपयुक्त आणि प्रगतीपथावर देणारे विविध उपक्रम या शतकमहोत्सवी वर्षात आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती बेनाडीकर यांनी दिली.

यावेळी महेंद्रसिंह बेनाडीकर, हर्षल बेनाडीकर, अश्विनी बेनाडीकर, शिवजीत बेनाडीकर, मनजीत बेनाडीकर, विनीत बेनाडीकर, सुजीत मोहिते आदी उपस्थित होते.