कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक कर्करोग दिनानिमित्त कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ४ ते १० फेब्रुवारी दरम्यान जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांसह इतर नागरिकांची मोफत कर्करोग तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. रेश्मा पवार यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.

जगभरात ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्याबद्दल जनजागृती, जागरूकता होणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कर्करोगाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. कागल येथील किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेडमध्ये कर्करोग जनजागृती मेळावा आयोजित केला आहे. येथे डायरेक्टर डॉ. रेश्मा पवार कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेसाठी कर्करोग तपासणीसाठी विशेष सवलतीचे पॅकेज देण्यात येणार आहे. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी या सर्व उपक्रमाचा व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. रेश्मा पवार यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला डॉ. योगेश अनप, डॉ.शिरीष भामरे, डॉ.संभाजी पाटील आदी उपस्थित होते.