धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धामोड पंचायत समिती सदस्या वंदना विलास हळदे यांची आज (बुधवार) बिनविरोध निवड झाली. मावळते सभापती रुपाली पाटील यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सभापतीपदाची निवड करण्यासाठी घेतलेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली.

पंचायत समितीच्या स्थापनेपासून चौथ्यांदा धामोड पंचायत समिती सदस्यांना सभापतीपदाचा  मान मिळाला आहे. या अगोदर प्रथमतः कै.आंबाजी बाबुराव खामकर, कै.आण्णासाहेब शिवा नवणे, जयसिंग हिंदूराव खामकर यांनी हे पद भूषवले आहे. विशेष म्हणजे चार वेळच्या निवडीत एक वेळा धामोड वगळता तीन वेळा खामकरवाडी गावाने बाजी मारली आहे. तालुक्यात कोणत्याही गावाला असा योगायोग आलेला नाही. त्यामुळे ‘सभापतींच गाव’ म्हणून खामकरवाडी या गावाची तालुक्यात ओळख बनली आहे.

निवडीनंतर हळदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राधानगरी तालुकाध्यक्ष किसनराव चौगले, बिद्री साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन विजयसिंह मोरे, जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील आदींनी सत्कार केला. तर हळदे यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.