पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड

0
30

पुणे (प्रतिनिधी) : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रातल्या ​सत्तासंग्रामाला शनिवारीही हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी तोडफोड केली. तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

शुक्रवारी कुर्ल्याचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर काही लोकांनी हल्ला केला होता. अहमदनगरमध्ये बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. तोडफोड करणारे लोक शिवसेनेचे असल्याचा आरोप बंडखोर आमदारांच्या समर्थकांनी केला आहे. तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनी राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे.

ठाण्यात कायदा व सुव्यवस्था कडेकोट करण्यात आली असून, परिसरात शांतता राखण्यासाठी विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील हिंसाचार आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता पुढील ५ दिवस ३० जूनपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिसरात लाठ्या, शस्त्रे, पोस्टर जाळणे, पुतळे जाळणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय घोषणाबाजी किंवा स्पीकरवर गाणी वाजवण्यासही परवानगी नाही.