पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी जनसुराज्य शक्तीपक्षाच्या वैशाली पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार रमेश शेंडगे होते. ही निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.

पन्हाळा पं.स.मध्ये बारापैकी आठ सदस्य हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे असून येथे पक्षाची एकहाती सत्ता आहे. यामुळे जनसुराज्यशक्ती कडून  सभापती पदाचा कार्यकाळ सव्वा वर्षाचा ठरविण्यात आला आहे. पहिल्या सव्वा वर्षासाठी पृथ्वीराज सरनोबत यांची त्यानंतर अनिल कंदुरकर यांची सभापती पदी वर्णी लागली होती. पुढील अडीच वर्षासाठी हे सभापती पद सर्वसामान्य महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने गितादेवी पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांच्या कार्यकालानंतर तेजस्वीनी शिंदे, वैशाली पाटील, उपसभापती पदी रश्मी कांबळे कायम राहील्या होत्या. सभापती पदासाठी जनसुराज्य शक्तीचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी वैशाली पाटील तर उपसभापती पदासाठी रश्मी कांबळे यांचे नाव निश्चित केले.

आज (मंगळवार) सभापती निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी सभापतीपदासाठी वैशाली पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या विरोधात एकही अर्ज नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी रमेश शेंडगे यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यानंतर उमेदवारांचे तहसिलदार रमेश शेंडगे, गटविकास अधिकारी तुलसीदास शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी गितादेवी पाटील, अनिल कंदूरकर, संजय माने, पृथ्वीराज सरनोबत,प्रकाश पाटील,रविंद्र चौगले,पांडुरंग खाटकी,वैशाली पाटील, रेखा बोगरे, जि.प. सदस्य शंकर पाटील, कार्यकर्ते उपस्थित होते.