कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री अंबाबाई मंदिरातील दुकाने उघडण्यास १ जानेवारीपासून परवानगी देण्यात आली आहे. याबाबत देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी पाठपुरावा केला होता. त्याबद्दल मंदिर आवारातील दुकानदारांच्या शिष्टमंडळाने आज (शनिवार) वैशाली क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देवून सत्कार केला.

कोरोनामुळे गेली आठ महिने अंबाबाई मंदिर बंद होते. गेल्या महिन्यापासून मंदिर दर्शनाची मर्यादित वेळ ठरवून भाविकांसाठी खुले केले. परंतु, मंदिर आवारातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. याबाबत संबंधित दुकानदारांनी दुकाने उघडण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि वैशाली क्षीरसागर यांची भेट घेतली होती. त्यानुसार वैशाली क्षीरसागर यांनी देवस्थान समितीच्या बैठकीत यशस्वी पाठपुरावा केला. याबद्दल दुकानदारांनी राजेश क्षीरसागर आणि वैशाली क्षीरसागर यांचे आभार मानून सत्कार केला.

याप्रसंगी वैभव मेवेकरी, विश्वनाथ मेवेकरी, साजन सलुजा, संतोष काटवे, युवासेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे आदी उपस्थित होते.