म्हसवे येथे मुलीच्या स्मृतिप्रीत्यर्थ ११ दाम्पत्यांना वडाची रोपे भेट 

0
134

गारगोटी (प्रतिनिधी)  : तिच्या अपघाती मृत्यूच्या धक्क्यातून सावरताना कधी वर्ष सरले कळले ही नाही. म्हसवे येथील सामाजिक कार्यकर्ते अजित बाळासो यादव यांनी आपल्या मुलगीच्या वर्षश्राध्दाला ११ दाम्पत्यांना  वडाच्या रोपट्याचे वाटप करून मुलगीच्या आठवणीला उजाळा दिला.

म्हसवे (ता. भुदरगड)  येथील पत्रकार अजित यादव व अनुजा यादव  या  दाम्पत्याने  आपल्या मुलीच्या वर्षश्राध्दास ११ जोडप्यांना वडाच्या रोपट्याची अनोखी भेट देऊन मुलीच्या दुःखावर फुंकर घातली. कोरोना महामारीत सर्वत्र ऑक्सिजनची रुग्णांना कमतरता भासत होती. याच कारणातून ऑक्सिजन देणारे वडाच्या रोपांची  सर्वत्र लागवड करणे  गरजेचे  आहे. निसर्गाचा समतोल व पर्यावरणाचे रक्षण  करण्यासाठी     मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ  वडाची रोपे  ११ जोडप्यांना भेट देवून जीवसृष्टीतील ऑक्सिजनचे महत्त्व यादव पती- पत्नींनी अधोरेखित केले.

एक वर्षापूर्वी अजित यादव यांच्या मुलीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता.  पहिल्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या लाडक्या मुलीची स्मृती चिरंतन स्मरणात राहावी, यासाठी वडाचे रोपांचे वाटप करण्यात आले. या  ११ दाम्पत्यांचा  पुढील दिवाळीत   आहेर देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे म्हसवे पंचक्रोशीत     कौतुक केले जात आहे.