मुंबई (प्रतिनिधी) : देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात महाराष्ट्र राज्याने आघाडी घेतली आहे. प्रथम क्रमांकावर असलेल्या राज्याने आतापर्यंत सुमारे १ कोटीहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले आहे. राज्यात १ कोटी ३८ हजार ४२१ जणांनी लस घेतली आहे. लसीकरणाचा वेग येत्या काळात आणखी वाढवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात १६ जानेवारीला लसीकरण अभियान राबवण्यास सुरूवात झाली होती.  पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू केले होते. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांपुढील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्यास सुरूवात झाली. १ मार्चपासून तिसऱ्या टप्पा सुरू करण्यात आला होता. तर चौथ्या टप्पा नुकताच १ एप्रिलला सुरू झाला आहे.

दरम्यान, राज्यात सध्या लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आणखी लसीची मागणी केली आहे. आतापर्यंत झालेल्या लसीकरणाच्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे.