काबुल (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानराज येणारे असल्याचे  स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे देश सोडण्यासाठी काबुल विमानतळावर मोठी गर्दी उसळली आहे. लष्करी विमान पकडण्यासाठी पळणाऱ्या अफगाण नागरिकांना रोखण्यासाठी अमेरिकन सैनिकांनी हवेत गोळीबार केला. यावेळी अफगाण नागरिकांसह विविध देशांचे नागरिक विमानतळावर होते.

हा गोळीबार अमेरिकन सैनिकांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे. काबुल विमानतळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे हवेत गोळीबार केला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घानी यांनी देश सोडल्यानंतर तालिबानी दहशतवादी काबुलमध्ये घुसले. त्यामुळे शहरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. तालिबान राजवटीचा अनुभव असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती, दहशत आहे. त्यामुळे देश सोडण्यासाठी काबुल विमानतळावर गर्दी उसळली आहे. मूळ अफगाणी नागरिकांनीही देशाबाहेर जाण्यासाठी गर्दी केली आहे. रस्त्यावर तालिबानी दहशतवाद्यांना पाहून नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली, असे काबूल पीस फोरमच्या शरीफ साफी यांनी सांगितले.