कोल्हापूर (प्रतिनिधी) : खा. संजय मंडलिक यांनी मुरगूड, कागल, आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड नगरपंचायतींना वैशिष्ट्यपूर्ण कामांकरीता  निधी मिळावा यासंदर्भात नगरविकास मंत्री नाम. एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. यानुसार या तीन नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींकरीता नगरविकास विभागाकडून साडेतीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती खा. संजय मंडलिक यांनी दिली.

खा. मंडलिक म्हणाले की, नगरविकास विभागाकडून राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपुर्ण कामाकरीता विशेष अनुदान दिले जाते. या योजनेमध्ये हाती घ्यावयाची कामे ही नागरीकांच्या लक्षात येतील अशा स्वरुपांच्या कामांनाच प्राधान्य देण्यात येते. त्या अनुषंगाने गडहिंग्लज नगरपरिषद हद्दीतील हिरण्यकेशी नदीघाटाचे संवर्धन आणि विकसीत करणार आहेत. आजरा नगरपंचायतीकरीता ओल्या कचऱ्यापासून विद्यूत निर्मीती प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असल्याकारणाने विजेची बचत होणार आहे.

मुरगूड नगरपालिका वाढीव पाणी पुरवठा योजनेकरीता नगरपंचायत हद्दीतील रस्त्याची खुदाई झाली असल्याकारणाने याठिकाणी नविन रस्त्यांसाठी एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे. कागल नगरपालिकातंर्गत आवश्यक त्या ठिकाणी हायमास्ट दिवे बसविणार आहेत. चंदगड नगरपंचायत अंतर्गत शिवशक्ती स्थळासभोवती बगिचा व तत्सम मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी हा निधी मंजूर झाल्याचे खा. मंडलिक यांनी सांगितले.