कोल्हापूर (प्रतिनिधी) :  स्वामी विवेकानंद जयंती व युवक दिनाचे औचित्य साधून समिधा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या  रोजगाराची माहिती देणाऱ्या फेसबुक पेजचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी गोशिमाचे माजी अध्यक्ष श्रीकांत पोतनीस होते.

कोल्हापूर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर उद्योग व व्यवसाय आहेत. या उद्योगात हेल्परपासून इंजिनिअरपर्यंत, सेल्समनपासून मॅनेजरपर्यंत, डिलिव्हरी बॉय पासून वितरण व्यवस्थापकापर्यंत कर्मचाऱ्यांची आवश्यकता वेळोवेळी भासत असते. त्या त्या उद्योगाच्या ठिकाणी ही माहिती लावलेली असते. परंतु ती गरजू युवकांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे गरजू आणि नोकरी देणारे दोघेही वंचित रहातात. हे लक्षात आल्यामुळे समिधा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी या दोहोमध्ये दुवा म्हणून काम करण्याच्या संकल्पनेतून हे पेज तयार केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस ज्येष्ठ श्रीपूजक बाबुराव ठाणेकर यांनी अध्यक्षासहित चेंबर्स ऑफ कॉमर्सचे व्यापारी प्रतिनिधी जयंतभाई गोयाणी, क्रिडाई चे संचालक संदीप मिरजकर, महाद्वार रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्याम जोशी, लॉजिंग-बोर्डिंगचे अध्यक्ष विक्रम शेवरे, संदीप देसाई, महाद्वार रोड व्यापारी व रहिवासी संघाचे अध्यक्ष सचिन जाधव, आर्य चाणक्य पतसंस्थेचे व्यवस्थापक शिंदे, महालक्ष्मी फेरीवाला संघटनेचे उपाध्यक्ष अविनाश उरसाल, हिंदवी ग्रुपचे सुदर्शन सावंत आणि दयावान ग्रुपचे मानसिंग पोवार यांचे स्वागत केले.

श्रीकांत पोतनीस, संदीप मिरजकर, जयंत गोयाणी,  श्याम जोशी यांनी उपक्रमास शुभेच्छा देऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.