नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना भरपाई देण्यासंदर्भात मार्गदर्शक नियमावली तयार करेपर्यंत कोरोनाची तिसरी लाट ओसरून जाईल, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आज (शुक्रवार) खडेबोल सुनावले.

जेव्हा तुम्ही पुढची पाऊले उचलाल, तेव्हा तिसरी लाट संपलेली असेल. मृत्यू प्रमाणपत्र आणि भरपाई याबाबतचा आदेशा यापूर्वीच पास झाला होता, असे न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने १६ ऑगस्टच्या सुनावणीत ४ आठवड्यात मार्गदर्शक नियमावली तयार करण्याची सूचना दिली होती. आता या आदेशाला दोन आठवडे उलटून गेले आहेत. आज करोना मृत्यू प्रमाणपत्रावरील मार्गदर्शक नियमावलीबाबत प्रतिज्ञापत्र मागितले होते. मात्र, केंद्र सरकारच्या वकिलांनी एका आठवड्याचा अतिरिक्त वेळ मागितला आहे. त्यावर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे. आता ११ सप्टेंबरपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृत्यू प्रमाणपत्र प्रक्रिया सुलभ करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ३० जूनला दिलेल्या न्यायिक आदेशांचे पालन करण्यास सांगितले आहे. यासाठी ११ सप्टेंबर किंवा त्याआधी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिल्या आहेत.