..तोपर्यंत मायक्रोफाईनान्स कंपन्यांची कर्जवसुली थांबवावी : संजय राजगोळे

0
63

चंदगड (प्रतिनिधी) : तहसीलदार यांच्याशी जोपर्यंत चर्चा होत नाही, तोपर्यंत मायक्रोफाईनान्स कंपन्यांची कर्जवसुली थांबविण्यात येत असल्याचे तोंडी आदेश नायब तहसीलदार संजय राजगोळे यांनी आज (बुधवार) झालेल्या बैठकीत दिले.

काही दिवसांपूर्वी मायक्रोफाईनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात भाजपच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा रत्नप्रभा देसाई यांच्या नेतृत्वाखाली अडकुर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी तहसीलदार विनोद रणवरे यांनी बैठक घेऊन समन्वय साधण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे महिला आंदोलक आणि मायक्रोफाईनान्स प्रतिनिधी यांच्यामध्ये आज तहसिलदार कार्यालय येथे बैठक बोलावण्यात आली होती. तहसिलदार रणवरे शासकीय कामानिमित बाहेरगावी असल्यामुळे नायब तहसीलदार संजय राजगोळे व पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी आंदोलक महिला व मायक्रोफाईनान्स प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. यावेळी फायनान्स कंपनीचे ठराविकच प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळे अनुपस्थित असलेल्या फायनान्स प्रतिनिधींना नोटीस काढून मिटींग होईपर्यंत वसुली बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

तसेच तहसीलदार यांच्याशी पुढील बैठक होईपर्यंत कोणत्याही फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी अथवा अधिकारी कोणाकडेही वसुलीसाठी जाणार नसल्याबाबत लेखी हमी लिहून घेण्यात आली. तसेच कोणी कर्जवसुलीसाठी तगादा लावल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही यावेळी उपनिरीक्षक पवार यांनी दिला.

यावेळी महिला जिल्हाध्यक्षा रत्नप्रभा देसाई, नेसरीकर, संदिप नांदवडेकर, नितीन फाटक, जयंत देसाई, अनंत कांबळे, धोंडीबा नाईक, गुणवंता कांबळे, शारदा कांबळे, सुषमा कांबळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.