वडगाव बाजार समितीच्या सभापतीपदी सुरेश पाटील यांची बिनविरोध निवड…

0
305

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुतन सभापतीपदी सुरेश पाटील आणि उप सभापतीपदी जगोड पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर आज पहिलीच बैठक बोलविण्यात आली होती.

या बैठकीमध्ये नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीर निबंधक बी. के. पाटील, मकसूद शिंदे यांनी काम पाहिले. तसेच सभापती, उपसभापती यांच्या नावाची घोषणा माजी सभापती आणि नूतन वडगाव बाजार समितीचे संचालक विलास खानविलकर यांनी केली. या नावांना सर्व संचालकांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिले.

तसेच सभापती सुरेश पाटील आणि उपसभापती जगोड पाटील यांचा सत्कार छ. राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, माजी सभापती शहाजी पाटील, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील,वारणा साखर कारखाना संचालक राजवर्धन मोहिते, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, भाजप तालुका अध्यक्ष राजेश पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी आ. महादेवराव महाडिक, आ. प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार विनय कोरे, सुरेश हाळवणकर, ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर, सुजित मिणचेकर आदी गटाचे कार्यकर्ते संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.