इस्लामपूर येथे मैत्रिणीबरोबर शरीरसंबंधास नकार देणाऱ्या तरूणावर पोलिसाकडून अनैसर्गिक अत्याचार  

0
1206

इस्लामपूर (प्रतिनिधी) : मैत्रिणीबरोबर शरीरसंबंध करून देण्यास नकार देणाऱ्या तरूणाकडून खंडणी उकळून त्याच्यावरच पोलीस कर्मचाऱ्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यातील हणमंत कृष्णा देवकर (वय ३४, रा. राजेबागेश्वरनगर, इस्लामपूर) या पोलीस कर्मचाऱ्याला अटक कऱण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित तरूण इस्लामपूर शहरात उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. २७ ऑक्टोबररोजी पहाटे तीनच्या सुमारास तरूण आपल्या मैत्रिणीला भेटून आपल्या वसतिगृहाकडे जात होता. त्यावेळी गस्तीवर असणारे पोलीस हणमंत देवकर यांनी तरूणाला अडवून त्याची चौकशी केली. तसेच त्याचा मोबाईल नंबर घेऊन त्यास जाण्यास सांगितले.

दरम्यान, देवकर याने तरूणाच्या महाविद्यालयात जाऊन तुझे मैत्रिणीबरोबर प्रेमप्रकरण आहेत, याची माहिती दोघांच्या आईवडिलांना देण्याची धमकी देत तरूणाकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर घाबरलेल्या तरूणाने मित्राकडून ४ हजार रूपये उसने घेऊन देवकरला दिले. त्यावर ही समाधान न झाल्याने देवकर यांने त्या तरूणाकडे तुझ्या मैत्रिणीचा नंबर दे. तिला माझ्यासोबत शरीरसंबंध करायला सांग, असे सांगितले. तरूणाने यास नकार दिल्यावर देवकर त्या तरूणाला जबरदस्तीने त्याच्या खोलीवर घेऊन गेला. आणि तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच याचा व्हिडिओ तयार केला.

त्यानंतर रविवारी दुपारी साडेबाराला पुन्हा महाविद्यालयात तरूणाकडे जाऊन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. यावर भेदरलेल्या तरूणाने या प्रकाराची माहिती आपल्या मित्राला दिली. त्यानंतर त्या दोघांनी याप्रकाराची माहिती पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी दिली. गेडाम यांच्या सूचनेवरून तरूणाने या प्रकाराची फिर्याद दिल्यावर देवकरला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण करत  आहेत.