कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा… या संत तुकाराम महाराजांच्या ओवी प्रमाणे अवघ्या ८ वर्षांच्या  दुर्वांक गुरुदत्त गावडे याने अनोखा जागतिक विक्रम केला आहे. कोल्हापुरातील शांतिनिकेतन प्रशालेत तिसरीमध्ये शिकणाऱ्या दुर्वांकने २०० विषाणूंची यादी तयार केली. या विषाणूंची अवघड नावे त्याने अवघ्या २ मिनिटे ३७ सेकंदामध्ये सांगून विश्वविक्रम केला. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.  

दुर्वांक सिनियर केजीमध्ये असताना तो अॅबॅॅकससारख्या बौद्धिक विकासाच्या क्लासमध्ये रमू लागला. पहिल्याच झटक्यात राष्ट्रीय स्पर्धेमध्ये २ मिनिट २० सेकंदात १०० गणिते सोडवून त्याने पहिला क्रमांक मिळवला व स्पोर्ट्स सायकलीचा मानकरी ठरला. शाळेतील राष्ट्रीय विज्ञान ऑलिंपियाड, आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाड यासारख्या अवघड परीक्षेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. एनएसटीएसई या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवून आपली छाप पाडली. ब्रेनोन ब्रेन, पझ्झल मेनिया सारख्या विविध स्पर्धांमध्येही आपल्या नावाची नोंद केली.

त्याच्या जडणघडणीमध्ये आई वंदना आणि वडील गुरुदत्त गावडे यांचा सिंहाचा वाटा आहे. तर या जागतिक विक्रमासाठी त्याला चाटे कोचिंग क्लासेसचे शिक्षक चंद्रकांत पाटील, शांतीनिकेतन प्रशालेचे अध्यक्ष संजय डी. पाटील, डायरेक्टर राजश्री काकडे, शिक्षकवृंद यांचे सहकार्य, ‘अॅबॅॅकस’चे शिक्षक प्रणाली आमते, धनराज आमते यांचे मार्गदर्शन लाभले.